छत्रपती संभाजीनगर नितीन दांडगे
अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलिसांनी मिळून गेल्या महिनाभरात राज्यभर विशेष मोहीम सुरू केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात जमिनीवरील परिस्थिती मात्र वेगळीच चित्र दर्शवत आहे. शहरांमधील मुख्य बाजारपेठा, शाळा-महाविद्यालयांचे परिसर आणि भर चौकाचौकांत गुटखा, सुगंधी तंबाखू, बार सुपारी मिश्रित तंबाखू आणि ‘खरा’ (मावा) यांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, “प्रशासनाची कारवाई नक्की कोणासाठी आणि कशासाठी?” असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात असून, FDA ची कारवाई फक्त नावापुरती आणि कागदावरच मर्यादित आहे का? असा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. “प्रशासनाकडून फक्त कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केल्याचे आकडे जाहीर केले जातात, पण रोज सकाळी टपऱ्यांवर मिळणारा गुटखा बंद होत नाही. ही धडक मोहीम जर इतकीच गतिमान आहे, तर मग शहरात ठीक ठिकाणी दररोज सुगंधी तंबाखू आणि खरा कसा मिळतो?” तपासणीचा केवळ फार्स? चौकाचौकांत राजरोस विक्री होत असून राज्य सरकारने गुटखा आणि तंबाखूमिश्रित पदार्थांवर पूर्णपणे बंदी घातली असली, तरी शहरातील गल्लीबोळांपासून ते मुख्य चौकांपर्यंत या प्रतिबंधित पदार्थांचा पुरवठा अखंडित सुरू आहे. पानटपऱ्या आणि छोट्या दुकानांमध्ये सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू आणि तंबाखूमिश्रित ‘खरा’ ग्राहकांना सहज उपलब्ध करून दिला जात आहे. विशेष म्हणजे, ज्या चौकांमध्ये पोलिसांचा पहारा असतो किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांची ये-जा असते, तिथेही ही विक्री छुप्या आणि काही ठिकाणी अगदी राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचा धाक नेमका उरलाय कोणावर, अशी चर्चा रंगू लागली आहे.शहरात आणि त्यातही विशेषतः तरुण पिढीला विळखा घालणाऱ्या या सुगंधी तंबाखू व खऱ्याच्या विक्रीला चाप लावण्यासाठी केवळ ‘नवा पुरस्कार’ किंवा मोहिमांचे ढोल न वाजवता, प्रत्यक्ष मैदानात उतरून कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) स्थानिक अधिकारी या वाढत्या छुप्या विक्रीवर आता तरी ठोस कारवाई करणार की नेहमीप्रमाणे ‘डोळेझाक’ करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट
पाच विभागांचा समन्वय कागदावरच?
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटित गुटखा रॅकेटविरोधात थेट ‘मकोका’ (MCOCA) लावण्याची घोषणा केली होती, तसेच FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही सर्व विभागांना कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. या मोहिमेत खालील पाच प्रमुख विभागांचा समन्वय असल्याचा दावा करण्यात आला होता. FDA (अन्न व औषध प्रशासन), स्थानिक पोलिस व गुन्हे शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जीएसटी (GST) विभाग, परिवहन विभाग (RTO) मात्र, एवढ्या मोठ्या यंत्रणा एकत्र काम करत असतानाही शहराच्या नाका-नाक्यावर गुटखा कसा पोहोचतो, हा सर्वात मोठा संशोधनाचा विषय बनला आहे. सर्व यंत्रणांचा हा संयुक्त दावा केवळ कागदी घोडे नाचवण्यापुरताच मर्यादित आहे की काय, अशी शंका घेण्यास आता वाव मिळत आहे.
चौकट
शहरातील सुज्ञ नागरिकांकडून आता थेट यंत्रणेच्या हेतूवरच बोट ठेवले जात आहे. वरिष्ठ पातळीवरून आदेश सुटतात, कागदावर मोठ्या कारवाया दाखवल्या जातात, काही ठिकाणी छापे टाकून प्रसिद्धीही मिळवली जाते; मात्र स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या गुटख्याच्या आणि सुगंधी सुपारीच्या पाकिटांना रोखण्यात स्थानिक अधिकाऱ्यांना अपयश येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
राजू सुरडकर नागरिक
[चौकट]
”गुटखा आणि प्रतिबंधित अंमली पदार्थांविरोधातील कारवाई कुठेही थांबलेली नाही. अन्न व औषध प्रशासन (FDA) अत्यंत सतर्कतेने आपले काम करत असून, शहरात आणि जिल्ह्यामध्ये कारवायांचे सत्र सातत्याने सुरू आहे. छुप्या मार्गाने विक्री करणाऱ्यांवर आमचे बारीक लक्ष असून, पोलिसांच्या समन्वयाने पुढील काळात हे धाडसत्र अधिक तीव्र केले जाईल. नागरिकांना कुठेही अशी बेकायदेशीर विक्री आढळल्यास त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.”दयानंद पाटील (सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग)