header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

दिल्लीचा धडा विसरले संभाजीनगर ?

तळघरांत भरतायत अभ्यासिका, कोचिंग क्लासेस; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

प्रतिनिधी सिद्धेश्वर थोर

छत्रपती संभाजीनगर : दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर परिसरातील राव आयएएस स्टडी सर्कलच्या तळघरात २७ जुलै २०२४ रोजी पावसाचे पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये तळघरातील कोचिंग क्लासेस, अभ्यासिका आणि व्यावसायिक वापरावर कारवाई करण्यात आली.

त्यानंतर २२ जून २०२६ रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ शहराच्या अलिगंज परिसरातील पुरानिया भागात एका तीन मजली व्यावसायिक इमारतीत भीषण आग लागली. या इमारतीच्या वरच्या मजल्यावर अनिमेशन व गेमिंग प्रशिक्षण देणारे कोचिंग सेंटर चालत होते. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी होते. आणखी अनेक विद्यार्थी जखमी झाले.इमारतीत एकच जिना होता. अग्निसुरक्षा मानकांचे पालन झाले नव्हते. बायोमेट्रिक प्रवेशद्वार व इमारतीच्या रचनेमुळे विद्यार्थ्यांना वेळेवर बाहेर पडता आले नाही. निवासी वापरासाठी मंजूर असलेल्या इमारतीत व्यावसायिक कोचिंग सेंटर चालवले जात असल्याचा प्रकार समोर आला

मात्र या भीषण दुर्घटनेचा धडा छत्रपती संभाजीनगरने विसरल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील अनेक व्यावसायिक संकुलांच्या तळघरांमध्ये आजही अभ्यासिका, कोचिंग क्लासेस, ट्युशन, मेस, आणि विविध व्यावसायिक आस्थापना सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे.

नियमांनुसार तळघराचा वापर प्रामुख्याने पार्किंग किंवा स्टोअररूमसाठी करण्याची परवानगी असते. बांधकाम परवानगी, अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आणि मंजूर नकाशामध्येही तळघराचा वापर याच उद्देशासाठी दर्शविला जातो. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी याच तळघरांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होत असून तासन्तास अभ्यासिका आणि कोचिंग क्लासेस सुरू असतात.

सध्या पावसाचे दिवस सुरू असून शहरात अधूनमधून पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत तळघरांमध्ये सुरू असलेल्या अभ्यासिका आणि कोचिंग क्लासेसबाबत सुरक्षेची चिंता अधिक वाढली आहे. स्पर्धा परीक्षा, एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी दररोज या तळघरांमध्ये वेळ घालवत असतात. अनेक ठिकाणी पुरेसे वायुवीजन नाही, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग नाहीत, तर काही ठिकाणी एकाच जिन्यावर संपूर्ण व्यवस्था अवलंबून असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत पावसाचे पाणी शिरणे, शॉर्टसर्किट, आग किंवा अन्य आपत्ती उद्भवल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

दिल्ली दुर्घटनेनंतर काही काळ प्रशासनाने हालचाली केल्या होत्या. नोटिसा बजावण्यात आल्या, तपासणी मोहीम राबविण्यात आली; मात्र कालांतराने सर्व काही पूर्ववत झाल्याचे दिसते. आजही शहरातील अनेक तळघरांमध्ये नियमबाह्य वापर सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

प्रशासनाच्या नोंदीत तळघर पार्किंगसाठी आणि प्रत्यक्षात त्याठिकाणी क्लासेस, अभ्यासिका किंवा व्यावसायिक उपक्रम सुरू असतील तर ही केवळ नियमभंगाची बाब नसून ती विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर बाब आहे. दिल्लीसारखी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

महानगरपालिका, नगररचना विभाग, अग्निशमन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून शहरातील सर्व तळघरांची तपासणी करावी, नियमबाह्य वापर तातडीने बंद करावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90