header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

फर्दापूर बसस्थानकाजवळील पुलावर पावसाचे पाणी साचल्याने अपघातांचा धोका; पादचारी मार्गाच्या कामाचीही मागणी

शेख हक्कानी 

फर्दापूर, दि. ४ : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग (NH-753F) वरील फर्दापूर बसस्थानकाजवळील पुलाची दुरवस्था वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठीही धोकादायक ठरत आहे. चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊन तब्बल आठ वर्षे उलटूनही या पुलावर अद्याप डांबरीकरण करण्यात आलेले नसल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असून अपघातांची मालिका सुरू आहे.

पुलावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. शनिवारीही एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन तो जखमी झाल्याची घटना घडली. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

याशिवाय पुलावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य निचऱ्याची व्यवस्था नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. साचलेल्या पाण्यातून अवजड वाहने गेल्यानंतर घाण पाणी दुचाकीस्वार व पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे या पुलावर नागरिकांना सुरक्षितपणे चालण्यासाठी पादचारी मार्ग (फुटपाथ) देखील उपलब्ध नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना वाहनांच्या रहदारीतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी पुलावर तातडीने पादचारी मार्गाची उभारणी करण्याची मागणी केली आहे.

जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इतर पुलांचे डांबरीकरण पूर्ण झाले असताना फर्दापूर बसस्थानकाजवळील पुलाकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातून हजारो पर्यटक याच मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे या पुलाची तातडीने दुरुस्ती करून डांबरीकरण, पाणी निचऱ्याची व्यवस्था आणि पादचारी मार्गाचे काम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90