header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

M.S.E.B.ला उशिरा सुचलेले शहाणपण! उन्हाळ्यात झोपलेले प्रशासन पावसात जागे; रामनगरात अखेर धोकादायक फांद्यांची कटाई

हिंदू प्रकाशवार्ता | प्रतिनिधी : सिद्धेश्वर थोर 

छत्रपती संभाजीनगर : महावितरणने ३० जूनपर्यंत विद्युत तारेला स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्यांची तातडीने छाटणी करण्याचा अल्टिमेटम दिला होता. मात्र त्याकडे संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याने आता पावसाळा सुरू झाल्यानंतर महानगरपालिकेला रामनगर परिसरात धोकादायक फांद्यांची कटाई करावी लागत आहे. त्यामुळे “जी कामे उन्हाळ्यात व्हायला हवी होती, ती पावसाळ्यात का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

रामनगर परिसरातील मोठ्या वृक्षांच्या फांद्या विद्युत तारांना स्पर्श करत असल्याने शॉर्टसर्किट, स्पार्किंग आणि वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका निर्माण झाला होता. अखेर शनिवारी महानगरपालिकेच्या पथकाने हायड्रॉलिक क्रेनच्या साहाय्याने झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू केली. पावसाच्या वातावरणात सुरू असलेल्या या कामामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी एन-२ विठ्ठलनगर परिसरात झाडाची मोठी फांदी थेट विद्युत तारेवर कोसळली होती. त्यातून झालेल्या स्पार्किंगमुळे डीपीला आग लागली होती. डीपीभोवती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झुडपांमुळे आग अधिक भडकली होती. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र मोठी दुर्घटना टळली होती. या घटनेनंतरही संबंधित विभागांनी वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे.

महावितरणने वेळेत सूचना देऊनही फांद्यांची छाटणी का झाली नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. उन्हाळ्यात कोरड्या वातावरणात ही कामे सुरक्षितपणे पूर्ण होऊ शकली असती. मात्र आता पावसाळ्यात ओल्या वातावरणात विद्युत तारांजवळ काम करावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांनाही अतिरिक्त धोका निर्माण झाला आहे.

शहरातील अनेक भागांत अजूनही झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर झुकलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे महापालिका आणि महावितरण यांनी परस्पर समन्वय ठेवून नियमित छाटणी, डीपी परिसरातील झुडपे हटविणे आणि धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होईल का, असा संतप्त प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90