हिंदू प्रकाशवार्ता प्रतिनिधी
बिडकीन DMIC परिसरामध्ये दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीमध्ये असलेल्या एका अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा बिडकीन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना रंगेहात अटक केली असून, अंधाराचा फायदा घेऊन दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी, महागडे मोबाईल आणि दरोड्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ५ लाख २० हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ३ जुलै रात्री बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह बिडकीन DMIC परिसरात पेट्रोलिंग करत होते. ४ जुलै रोजी पहाटे १:४५ वाजताच्या सुमारास ते निलजगाव रोडवर आले असता, त्यांना गुप्त बातमीदाराकडून एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. बिडकीन DMIC परिसरातील सेक्टर क्रमांक १९, शिवनाई शिवार भागात एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत पाच संशयास्पद इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील आणि त्यांच्या अंमलदारांनी तातडीने दोन पंचांना सोबत घेतले आणि पहाटे २:३० वाजता सेक्टर १९ मधील मुख्य रोडवर सापळा रचला. काही वेळातच पोलिसांना बातमीदाराने सांगितलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी येताना दिसली. पोलिसांनी तत्परतेने गाडीला थांबण्याचा इशारा केला, मात्र पोलिसांना पाहताच स्कॉर्पिओ चालकाने गाडीचा वेग वाढवून ती भरधाव वेगात पुढे पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता शासकीय वाहनाने पाठलाग करून स्कॉर्पिओ गाडीला आडवे पाडले आणि ती थांबवली. गाडी थांबताच त्यातील दोन इसम अंधाराचा फायदा घेऊन शेतात पळून गेले, परंतु पोलिसांनी गाडीतील इतर तिघांना जागीच घेरून ताब्यात घेतले. पकडण्यात आलेले तिन्ही आरोपी हे अजवा नगर, वाळूज, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांची कसून अंगझडती घेतली असता दरोड्याच्या पूर्वतयारीचे साहित्य आणि मुद्देमाल मिळून आला. गाडीचा चालक रईस शेख शहीर (वय ३२ वर्षे) याच्या अंगझडतीत १०,००० रुपये किमतीचा विवो V40 कंपनीचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली ५,००,००० रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी (क्रमांक MH-41-C-8005) आणि १०० रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची दोरी आढळून आली. दुसरा आरोपी अमोल काशीनाथ खरात (वय ३० वर्षे) याच्याकडे ५० रुपयांचा छोटा काळसर रंगाचा कटर आणि ५० रुपयांचा हिरव्या रंगाचा स्क्रू ड्रायव्हर सापडला. तर तिसरा आरोपी रईस शेख युनूस (वय ३२ वर्षे) याच्या अंगझडतीमध्ये १०,००० रुपये किमतीचा विवो V40e कंपनीचा मोबाईल, ५०० रुपये किमतीचा एक निळसर रंगाचा लोखंडी कटर आणि ४० रुपये किमतीचे दोन हिरव्या रंगाचे हेक्झा ब्लेड जप्त करण्यात आले. पोलिसांनी हा सर्व ५,२०,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. आरोपी अमोल काशीनाथ खरात याच्यावर यापूर्वी वाळूज, एमआयडीसी वाळूज आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात वाहन चोरी, दरोड्याची तयारी, जबरी चोरी आणि बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी तब्बल ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच चालक रईस शेख शहीर याच्यावर २०१७ मध्ये एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.