हिंदू प्रकाशवार्ता प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर
“जगाचा पोशिंदा” म्हणवून घेणाऱ्या शेतकऱ्याच्या रक्ताचं पाणी करून कमावलेल्या पैशावर डल्ला मारणाऱ्या चिंचपुर येथील मंडळ अधिकारी यांच्या दोन खाजगी इसमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अखेर त्यांच्या पापाची जागा दाखवून दिली आहे. काळ्या आईची सेवा करून जगाचं पोट भरणारा शेतकरी जेव्हा आपल्या हक्काच्या दोन गुंठे जमिनीच्या फेरफारसाठी शासकीय कार्यालयात जातो, तेव्हा त्याला सहकार्य करण्याऐवजी त्याचं रक्त शोषायला बसलेल्या अशा प्रवृत्तींचा सामना करावा लागतो, हे अत्यंत संतापजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावण्याची कोणाची हिंमत नव्हती, पण आज लोकशाहीच्या नावाखाली बळीराजालाच लुटणाऱ्या या खाजगी इसमांचा पर्दाफाश करत एसीबीच्या पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. सविस्तर वृत्त असे की, मौजे चिंचपूर येथील एका स्वाभिमानी शेतकऱ्याने (तक्रारदार) आपल्या कष्टाच्या पैशातून २० नोव्हेंबर २०२५ रोजी गट क्रमांक १२३ मध्ये दोन गुंठे जमीन खरेदीखताद्वारे खरेदी केली होती. या जमिनीची शासकीय दप्तरी रीतसर नोंद व्हावी, यासाठी पालोद येथील तलाठी सजा कार्यालयाकडून फेर मंजुरीचा प्रस्ताव मंडळ अधिकाऱ्यांकडे प्रलंबित होता. शेतकरी राजा आपल्या हक्काच्या कामासाठी आशेने चकरा मारत होता, पण तिथे आधीच सावज टिपण्यासाठी टपलेला मंडळ अधिकाऱ्याचा खाजगी मदतनीस अमोल बडक याने शेतकऱ्याची हतबलता पाहिली. तक्रारदाराने जेव्हा आपल्या प्रलंबित फेरफाराविषयी विचारणा केली, तेव्हा अमोल बडक या खाजगी इसमाने थेट सांगितले की, “मंडळ अधिकारी पालोद यांनी तुमचा फेर नामंजूर केला आहे. तो मंजूर करून घ्यायचा असेल तर साहेबांसाठी २०,००0 रुपये द्यावी लागेल!” निसर्गाच्या लहरीपणाशी आणि गरिबीशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्याकडे इतकी मोठी रक्कम मागताना या लाचखोरांचे हात कापले नाहीत. पण, बळीराजाने लाचखोरांपुढे झुकण्याऐवजी या अन्यायाचा निवाडा करण्याचं ठरवलं. शेतकरी राजाने थेट ६ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन तक्रार नोंदवली. ७ जुलै रोजी एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष या प्रकरणाची पडताळणी केली असता, लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. अखेर खूप गयावया केल्यानंतर १०,००० रुपयांवर तडजोड झाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करत या हुशार बनणाऱ्या खाजगी इसमांनी लाचेची रक्कम रोख स्वरूपात न घेता, थेट ‘फोनपे’ (PhonePe) द्वारे आरोपी सचिन बडक याच्या खात्यावर स्वीकारली. पण, कायद्याचे हात लांब असतात! शेतकऱ्याचा घामाचा पैसा डिजिटल खात्यात जमा होताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घालून अमोल श्रीरंग बडक (वय २८, व्यवसाय-शेती, मंडळ अधिकारी खाजगी मदतनीस) आणि सचिन काशिनाथ बडक (वय २९, दोघे रा. चिंचपूर, ता. सिल्लोड) या दोन्ही खाजगी इसमांना रंगेहाथ ताब्यात घेतले. सध्या सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, दोन्ही आरोपींच्या राहत्या घराची झडती घेण्याचे काम वेगाने सुरू होते.