हिंदू प्रकाशवार्ता/प्रतिनिधी
सोयगाव,दि.७ जुलै
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पवार यांनी केले.संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने १ जुलै ते ७ जुलै २०२६ दरम्यान महाविद्यालयाच्या परिसरात ‘वन महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ.शिरीष पवार व उपप्राचार्य डॉ.रावसाहेब बारोटे यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाली.यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात आंबा,वड, पिंपळ,कडुलिंब यासारख्या छायादार विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.’झाडे लावा,झाडे जगवा’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.सर्व उपस्थित विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी लावलेली झाडे जगवण्याची आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याची सामूहिक शपथ घेतली.
यावेळी बोलताना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सुनील चौधरे म्हणाले की,”केवळ झाडे लावणे पुरेसे नाही,तर त्यांचे संगोपन करणे ही आपली जबाबदारी आहे. महाविद्यालयाने यावर्षी दत्तक वृक्ष योजना सुरू केली असून,प्रत्येक विद्यार्थी एका झाडाची निगा राखणार आहे.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपक पारधे यांनी केले,तर आभार प्रदर्शन डॉ.शिवाजी शिरसाट यांनी केले.