header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

कापडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर 

वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची एलर्जी 

हिंगोली प्रतिनिधी/गोपाल सातपुते 

हिंगोली | सेनगाव तालुक्यातील कापडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. रात्री-अपरात्री आजारी पडणारे रुग्ण, गरोदर महिला तसेच सर्पदंशासारख्या आपत्कालीन घटनांमध्ये आरोग्य केंद्राचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना चोवीस तास आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील आजारांवर नियंत्रण, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, गरोदर महिला व नवजात बालकांची आरोग्य सेवा, लसीकरण, कुटुंब नियोजन, क्षयरोग, कुष्ठरोग, हिवताप, हत्तीरोग, अंधत्व निर्मूलन आदी विविध जबाबदाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत पार पाडल्या जातात.

मात्र कापडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने या सेवांवर परिणाम होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः पावसाळ्यात जलजन्य आजार, सर्पदंशाच्या घटना आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार मिळणे कठीण होत आहे. ग्रामीण भागातील अपुरी दळणवळण व्यवस्था लक्षात घेता रात्रीच्या वेळी गरोदर महिला व गंभीर रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्राच्या इमारती आणि यंत्रणा असूनही अधिकारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

कापडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियमानुसार मुख्यालयी राहून २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90