हिंदू प्रकाशवार्ता
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
रगरीब जनता, हक्काचे प्रश्न आणि गावाचा विकास यासाठी छातीठोकपणे प्रशासनाशी भिडणाऱ्या एका चांगल्या, सामाजिक काम करणाऱ्या सरपंचाची प्रशासकीय यंत्रणेकडून केली जाणारी कोंडी आता सर्वसामान्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. गेवराई पायगा (ता. फुलंब्री) येथील आक्रमक सरपंच मंगेश साबळे यांच्यावर ज्या पद्धतीने एकामागून एक गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्याचे सत्र सुरू आहे, ते पाहता “हा कायद्याचा बडगा आहे की सत्तेच्या इशाऱ्यावर सुरू असलेला प्रशासकीय सूड?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही मार्गाने हक्कासाठी आवाज उठवल्यानंतर आधी सिटी चौक पोलिसांनी त्यांना अटक केली. हा धक्का ओसरतो न ओसरतो, तोच आता महिनाभरापूर्वीच्या एका साध्या प्रसंगाचे भांडवल करून क्रांती चौक पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या सीईओ मिन्नू पी. एम. यांच्या गाडीसमोर उभे राहून ग्रामपंचायतीच्या हक्काच्या बिलासाठी जाब विचारणे हा जर गुन्हा असेल, तर लोकशाहीत जनतेने दाद मागायची कुणाकडे? असा उद्विग्न प्रश्न आता जनता विचारत आहे.मंगेश साबळे यांच्यावर एखाद्या अट्टल, सराईत गुन्हेगाराप्रमाणे कारवाई होताना पाहून फुलंब्री तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील जनता हळहळत आहे आणि पेटून उठली आहे. सोशल मीडियावर सध्या मंगेश साबळेंचे व्हिडिओ एखाद्या क्रांतिकारकाप्रमाणे व्हायरल होत असून, त्याला देशभक्तीच्या गाण्यांची जोड दिली जात आहे. जनता साबळेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी असताना, प्रशासन मात्र त्यांच्याभोवतीचा कायदेशीर फास अधिकाधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.एका सामान्य घरातील कार्यकर्ता, जो सरपंचाच्या माध्यमातून जनतेची सेवा करतोय, त्याला अशा प्रकारे प्रशासकीय ताकदीचा गैरवापर करून तुरुंगात सडवण्याचे कारस्थान जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. जर हा अन्याय असाच सुरू राहिला आणि राजकीय दबावापोटी मंगेश साबळे यांच्यावर आणखी गुन्हे लादले गेले, तर फुलंब्री तालुक्यातील जनता शांत बसणार नाही. या अन्यायाविरोधात जनआंदोलनाचा प्रचंड मोठा उद्रेक होईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सूडबुद्धीने वागणाऱ्या प्रशासनाची असेल, असा इशारा आता जनतेतून दिला जात आहे.
एकामागून एक गुन्हे…?
पहिले आंदोलन : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षकांना निवडणुक, एसआरआयच्या कामात लावल्या च्या विरोधात आवाज उठवला, म्हणून गुन्हा दाखल करत चार दिवसाची पोलीस कोठडी!
दुसरे आंदोलन : ८ जून रोजी जिल्हा परिषदेत हक्काचा निधी आणि बिलांसाठी सीईओ मिन्नू पी. एम. यांच्या गाडीसमोर उभे राहून जाब विचारला. तिथे कोणतीही अरेरावी नव्हती, आमदार प्रशांत बंब यांच्या मध्यस्थीने विषय शांत झाला आणि बिलेही निघाली.
आताची कारवाई : महिनाभर जुने झालेले हे प्रकरण अचानक उकरून काढण्यात आले. विशेष म्हणजे, यात कोणत्याही अधिकाऱ्याने तक्रार दिली नसून, पोलिसांनी ‘स्वतःहून’ (सुमोटो) फिर्याद दाखल केली आहे! काही मिनिटे गाडी रोखली म्हणून थेट गुन्हा? हा प्रशासनाचा अट्टहास कोणासाठी?
जिल्हाधिकाऱ्यांच्या आडून कोण काढतय खुन्नस ? पडद्यामागे ‘ती’ की तो ?
मंगेश साबळे हे काही महिन्यांपूर्वी एका बड्या लोकप्रतिनिधीच्या चुकीच्या कारभाराविरुद्ध अतिशय आक्रमक झाले होते. तेव्हापासूनच ते सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात खुपत होते. त्यामुळेच आता जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाचा ढाल म्हणून वापर करून साबळे यांना कायमचे संपवण्याचा, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा संशय फुलंब्री तालुक्यातील जनतेला येऊ लागला आहे. “जिल्हाधिकाऱ्यांच्या आडून धडा शिकवणारा तो ‘मास्टरमाइंड’ कोण?” याचीच चर्चा आता गल्लीबोळात सुरू आहे.
उद्या मंगेश भाऊ साबळे यांच्या जामीनासाठी व तसेच तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी केलेल्या खोट्या गुन्ह्या मध्ये अटक हे एका सरपंच आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे येऊन रोष व्यक्त केला त्याचा नेमका गुन्हा काय आहे त्याला चार दिवसापासून कोठडी टाकल्या जात आहे आणि म्हणून मी उद्या टीव्ही सेंटरच्या मोबाईल टावर वरती चढून आत्मदहनाचा इशारा देणार आहे.
गजानन देवरे
सामाजिक कार्यकर्ता
फुलंब्री