हिंगोली/गोपाल सातपुते
हिंगोली |राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, आषाढी एकादशीच्या महाउत्सवासाठी अकोला- पंढरपूर ही विशेष रेल्वे गाडी सोडण्याची घोषणा रेल्वे विभागाने केली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त मराठवाडा आणि विदर्भातून लाखो भाविक पंढरपूरकडे रवाना होतात. या भाविकांच्या सोयीसाठी २४ जुलै रोजी पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाडी सोडावी, अशी मागणी भाजपा नेते खासदार रामराव वडकुते यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. त्यावर रेल्वेमंत्र्यांनी पत्र पाठवून लवकरच उपाययोजना केल्या जातील असे कळविले होते. त्यानुसार भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाने अकोला- पंढरपूर विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे.
शुक्रवार, २४ जुलै रोजी ०७६३५ अकोला पंढरपूर ही गाडी अकोल्याहून सकाळी ११:०० वाजता सुटेल आणि शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी ९:२० वाजता पंढरपूरला, वाशिममार्गे दुपारी १२:०० वाजता, हिंगोली मार्गे दुपारी १२:५४ वाजता, वसमत येथे दुपारी २ वाजता, २:३० वाजता परभणी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक ०७६३६ शनिवार, २५ जुलै रोजी पंढरपूरहून दुपारी ४ वाजता सुटेल आणि परभणी (सकाळी १०:२५), पूर्णा (सकाळी ११), वसमत (सकाळी ११:४०), हिंगोली (दुपारी १२:३०), वाशिम (दुपारी १:१५) मार्गे रविवारी दुपारी ४:५० वाजता अकोला येथे पोहोचेल.
भाजपा नेते खासदार रामराव वडकुते यांच्या पाठपुराव्यानुसार रेल्वे विभागाने आषाढी एकादशीसाठी विशेष रेल्वेची घोषणा केल्याने पंढरपूर येथे दर्शनाकरिता जाणाऱ्या भाविकांची सुविधा होणार आहे.