हिंदू प्रकाशवार्ता
मुंबई
छत्रपती संभाजीनगर शहराची तहान भागवण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या जायकवाडी पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी आयोजित छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, शेवटच्या नागरिकाला नियमित आणि शुद्ध पाणी पुरवणे हे शासनाचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यामुळे या योजनेतील सर्व अर्धवट कामे कंत्राटदाराकडून युद्धपातळीवर पूर्ण करून घेतली पाहिजेत.या महत्त्वपूर्ण बैठकीला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, माजी खासदार डॉ. भागवत कराड प्रत्यक्ष उपस्थित होते. तर इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी योजनेच्या सद्यस्थितीचे सादरीकरण केले.बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंत्रणेला आणि कंत्राटदारांना ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले. कंत्राटदाराने कामाचे ठरावीक टप्पे निश्चित करावेत आणि योजनेच्या नियोजित टप्प्यांचा सविस्तर आराखडा तयार करून पुढील बैठकीत त्याचे सादरीकरण करावे. अर्धवट कामांमुळे शहरवासीयांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करता येत नसल्याने, संबंधित विभागाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कंत्राटदारासोबत स्वतंत्र बैठक घ्यावी. तसेच कामाचा दर्जा तपासण्यासाठी पाणी वितरण प्रणालीचे ‘हायड्रोलिक टेस्टिंग’ कंत्राटदाराकडून तातडीने पूर्ण करून घ्यावे.मुख्यमंत्र्यांनी महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाणीपुरवठा विभागाला आपापसात समन्वय ठेवून शहरातील नळ जोडण्या वाढवण्याचे आदेश दिले. कंत्राटदाराने वेळेत काम पूर्ण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ वाढवावे आणि त्यांच्या कामाचे वेळोवेळी मूल्यांकन केले जावे. जुन्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गतीने पूर्ण करावे. खोदलेले रस्ते आणि खड्डे तात्काळ दुरुस्त केले जावेत, जेणेकरून पावसाळ्याच्या दिवसांत शहरात कुठेही अपघाताची भीती राहणार नाही, याकडेही मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष वेधले.या महत्त्वाकांक्षी योजनेच्या सद्यस्थितीचा विचार केला तर, छत्रपती संभाजीनगर शहराच्या वर्ष २०५२ मधील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून ही योजना आखली गेली आहे. या अंतर्गत शहराला रोज ६०४ एमएलडी पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. पाणी वितरणासाठी शहरात एकूण ५९ पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार असून, त्यापैकी २९ टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच, शहरातील एकूण १९११ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीपैकी १२९१ किलोमीटर पाईपलाईनचे काम आतापर्यंत पूर्ण झाले असून, जवळपास ४६ हजार ५०० नळ जोडण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.