header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

परभणी ग्रोथ हब’च्या माध्यमातून कृषि उद्योगांना नवी दिशा : राज्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर

 हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी 

 परभणी:वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेसेस (CASMB) तथा सेवा भारती, देवगिरी (जि. परभणी) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक १८ जुलै २०२६ रोजी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोझियम हॉलमध्ये ‘उद्यम विकसित मराठवाडा मिशन’ अंतर्गत उद्योग–शैक्षणिक संवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कृषि क्षेत्रातील उद्योग, मूल्यवर्धन, उद्योजकता विकास आणि रोजगारनिर्मिती या विषयांवर या कार्यक्रमात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री (परभणी जिल्हा) माननीय ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते.

यावेळी चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेसेसचे सरचिटणीस डॉ. उमेश कांबळे, रांजणी (जि. धाराशिव) येथील नॅचरल उद्योग समूहाचे प्रकल्प समन्वयक श्रीपाद ठोंबरे, वसमत येथील भूमी न्यूट्रास्युटिकल्सचे अतिश साळुंखे, खाद्य तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ सतीश भोरकडे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख पाहुण्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री (परभणी जिल्हा) माननीय ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, विद्यार्थी केवळ नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनले पाहिजेत. कृषिआधारित उद्योगांच्या माध्यमातून परभणी तसेच मराठवाड्यातील स्थलांतर थांबविणे शक्य आहे. शेतीला प्रक्रिया उद्योग व पूरक व्यवसायांची जोड दिल्याशिवाय शेती अधिक लाभदायक होणार नाही. एकात्मिक शेती पद्धतीचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. त्या पुढे म्हणाल्या की, ‘परभणी ग्रोथ हब’ या संकल्पनेअंतर्गत सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन करण्यात आले असून, परभणी जिल्ह्यात ‘सिल्क अँड मिल्क’ या संकल्पनेवर आधारित पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कृषिआधारित उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, तांत्रिक मार्गदर्शन व शासनाचे सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल. कृषि पदवीधरांनी शेतीकडे उद्योजकीय दृष्टीने पाहावे, कारण शेतीतूनही मोठे उद्योग उभे राहू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, यशस्वी उद्योजकासाठी गंभीरता, विनम्रता, सहनशीलता आणि सातत्य हे गुण अत्यावश्यक आहेत. मराठवाड्यात कृषिआधारित उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून, परभणी जिल्ह्याची सुपीक जमीन, सक्षम मनुष्यबळ आणि कृषि संशोधनाची मजबूत पार्श्वभूमी ही मोठी ताकद आहे. “परभणी फर्स्ट” हा विकासाचा नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी उद्योग, शिक्षण संस्था आणि शासन यांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकरी गटांनी शेतीमालाच्या सामूहिक विक्रीची यशस्वी व्यवस्था उभी केली आहे. वसमत तालुक्यात करवंदासारख्या वनउत्पादनावर प्रक्रिया उद्योग सुरू असून, विद्यापीठाला अलीकडेच चार महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प मंजूर झाले आहेत. या संशोधनाचा लाभ उद्योग, शेतकरी आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्योजक श्री. श्रीपाद ठोंबरे यांनी सांगितले की, मराठवाड्यातील दुष्काळी भागात दुग्धव्यवसाय हा शाश्वत उत्पन्नाचा विश्वासार्ह स्रोत ठरत आहे. धाराशिव जिल्ह्यात दुग्धव्यवसायाला चालना मिळाल्यानंतर शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. इथेनॉल निर्मितीमुळे ऊस उत्पादकांना अधिक दर मिळत असून, शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून उर्जादाताही आहे, असे ते म्हणाले. ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी उद्योगांनी खेड्यांकडे वाटचाल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्री.अतिश साळुंखे यांनी उद्योग क्षेत्रातील बदलत्या संधींचा वेध घेताना तंत्रज्ञानाधारित कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची वाढती गरज अधोरेखित केली. ग्रामीण भागातील युवकांनी नवकल्पना, प्रक्रिया उद्योग आणि स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

खाद्य तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ श्री. सतीश भोरकडे यांनी अडचणी या संधी निर्माण करण्याचे माध्यम असतात. चिकाटी, सातत्य आणि नावीन्यपूर्ण विचार यांच्या बळावर यशस्वी उद्योग उभा राहू शकतो, असे प्रतिपादन केले.

प्रास्ताविकात डॉ. उमेश कांबळे यांनी ‘उद्यम विकसित मराठवाडा मिशन’ची भूमिका स्पष्ट करताना उद्योजकता विकासासाठी मराठवाड्यात विविध जिल्ह्यांमध्ये उद्योग–शैक्षणिक संवाद मेळावे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती दिली. या उपक्रमातून उद्योग, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि शासन यांच्यात समन्वय निर्माण करून स्थानिक युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास जिल्ह्यातील उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषि प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक, विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक तसेच विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90