पिशोर | प्रतिनिधी : बापूसाहेब हरणकाळ
पिशोर–कोळंबी–भारंबा तांडा या प्रमुख मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास जीवघेणा बनला आहे. रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, “खड्ड्यांत रस्ता की रस्त्यात खड्डे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पिशोर ही परिसरातील प्रमुख बाजारपेठ असल्याने कोळंबी, भारंबा तांडा, पळशी (बु.), जैतखेडा, जैतखेडा तांडा, साळेगाव, माळेगाव, ठोकळ तसेच परिसरातील अनेक गावांतील हजारो नागरिक दररोज या मार्गाचा वापर करतात. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, रुग्णवाहिका आणि विविध शासकीय-खासगी कामांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मात्र, खोल खड्ड्यांमुळे दररोज अपघाताचा धोका वाढत असून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या तोंडावर खड्डे तात्पुरते बुजवून जनतेची बोळवण केली जाते. मात्र, निवडणूक संपताच कायमस्वरूपी दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.
चार वर्षांनी पूल तयार; पण अप्रोच रस्ता अजूनही अधांतरी
पिशोर येथील लोकसेवा पेट्रोल पंपाजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे काम चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण झाले असले, तरी पुलाला जोडणारा अप्रोच रस्ता अद्याप अपूर्ण आहे. सुमारे ८० मीटरचा अप्रोच रस्ता पूर्ण होणे अपेक्षित असताना तो अद्याप पूर्ण झालेला नाही. शिवाय तयार करण्यात आलेला रस्ता अरुंद असल्याने एकावेळी एकच वाहन जाऊ शकते. त्यामुळे वाहतूक कोंडीसह गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
‘भविष्यातील गरज लक्षात घेऊन पूल उभारला’
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रवींद्र जारवाल यांनी सांगितले की, भविष्यातील ५० ते ६० वर्षांचा विचार करून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. राज्य मार्गाच्या निकषांनुसार पुलाची व अप्रोच रस्त्याची रुंदी निश्चित करण्यात आली आहे. भारंबा तांडा–कोळंबी रस्त्याच्या मूळ कामास मंजुरी मिळाली असून लवकरच कार्यादेश (वर्क ऑर्डर) दिला जाईल. तसेच संभाजीनगर–पिशोर रस्त्याचे काम एमएसआयडीसीमार्फत होणार असून पुलाचे उर्वरित कामही लवकर पूर्ण केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
युद्धपातळीवर दुरुस्तीची मागणी
संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने सर्व खड्डे बुजवून संपूर्ण रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी. तसेच पुलाच्या अप्रोच रस्त्याचे अपूर्ण काम युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनचालकांनी केली आहे.