रोख रक्कम, औषधे व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग सुरक्षित सुपूर्द; वृद्धाच्या डोळ्यांत आनंदाश्रू
हिंदू प्रकाशवार्ता : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : आजच्या काळात आर्थिक फसवणूक आणि हरवलेल्या वस्तू परत मिळण्याच्या घटना दुर्मीळ होत चालल्या असताना, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) चालक आणि वाहकांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. बसमध्ये सापडलेली साडेपाच हजार रुपयांची रोख रक्कम, औषधे आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग त्यांनी ८० वर्षीय वृद्धाला सुरक्षित परत करून माणुसकीचे दर्शन घडविले.
रविवार (१९ जुलै) रोजी सोलापूर–छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बस (क्र. एमएच-२० बीएल-३२२५) मध्ये वाहक जी. व्ही. शिरमेवार (बॅज क्र. ३९६७२) आणि चालक बी. डी. दहिफळे (बॅज क्र. २०५३२) यांना एक बेवारस बॅग आढळली. त्यांनी तत्काळ ती बॅग संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केली.
एटीआय एस. एस. बेग आणि लोकेश जाधव यांनी बॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये ५ हजार ६५३ रुपये रोख रक्कम, औषधे आणि रुग्णालयाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आढळून आली. चौकशीअंती ही बॅग ए. बी. देशमुख (वय ८०) यांची असल्याचे निष्पन्न झाले.
आवश्यक शहानिशा पूर्ण केल्यानंतर आगर व्यवस्थापक स्वाती घोडे यांच्या उपस्थितीत देशमुख यांना त्यांची बॅग आणि संपूर्ण साहित्य सुरक्षितपणे परत करण्यात आले. हरवलेली रक्कम आणि कागदपत्रे परत मिळाल्याने देशमुख यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्यांनी चालक-वाहक आणि एसटी प्रशासनाचे मनापासून आभार मानले.