मोंढा नाका परिसरातील ‘अजिंठा टोबॅको’वर FDA चा पुन्हा छापा; लाखोचा गुटखा जप्त
हिंदू प्रकाशवार्ता प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरशहरातील अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या मोंढा नाका परिसरातील जुना मोंढा नाका भागातील ‘अजिंठा टोबॅको’ या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकानेa पुन्हा एकदा धडक कारवाई केली. विशेष म्हणजे, यापूर्वी अनेकदा कारवाया होऊनही न जुमानता सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यावर टाकलेल्या या छाप्यात लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा हाती लागला आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अजिंठा टोबॅको’ या दुकानावर यापूर्वी प्रशासनाकडून अनेक वेळा कारवाया झाल्या आहेत. मात्र, कायदेशीर कारवाईचा धाक न बाळगता या ठिकाणी छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित पानमसाला आणि गुटख्याची साठवणूक करून विक्री केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार मिळत होत्या. याच पार्श्वभूमीवर FDA च्या पथकाने आज सापळा रचत ही अचानक कारवाई केली.शासनाने राज्यात गुटखा विक्रीवर संपूर्ण बंदी घातली असतानाही, मोंढा नाक्यासारख्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारे नियम धाब्यावर बसवून अवैध व्यवसाय सुरू होता. सध्या FDA च्या पथकाकडून दुकानातील मालाची कसून तपासणी आणि पंचनाम्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. या कारवाईमुळे शहरातील इतर अवैध गुटखा विक्रेत्यांचेही धाबे दणाणले असून, याप्रकरणी संबंधित दुकानदारावर कठोर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जिन्सी पोलीस स्टेशन मध्ये सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.