हिंदू प्रकाशवार्ता प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर विशेष प्रतिनिधी
शहरात वाहतूक शिस्तीचा मोठा गाजावाजा करत वाहतूक पोलिसांनी कागदी घोडे नाचवत १,२८५ रिक्षांवर दंडात्मक कारवाई केल्याचा फुगलेला दावा केला आहे. प्रशासनाने भलेही आकड्यांचे खेळ करत स्वतःच्या पाठीवर थापा मारून घेतल्या असतील, पण वास्तवात शहराच्या गल्लीबोळांत आणि मुख्य रस्त्यांवर मद्यधुंद, बेफिकीर आणि उर्मट रिक्षाचालकांची दहशत आजही कायम असून, सामान्य नागरिकांचा जीव रोज मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वीच बायपास रोडवर भरधाव आणि बेकदर आणि भरधाव वेगाने ऑटोमुळे झालेल्या भीषण अपघातात एका निष्पाप महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. एका हसत्याखेळत्या संसाराची राखरांगोळी झाली असताना, खाकी वर्दीतील कर्तेधर्ते नेमके काय करत आहेत? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांच्या काळजाला हात घालावा असाच निर्माण झाला आहे.रस्त्यावर निष्काळजीपणाने ऑटो चालवून सर्वसामान्यांचे नाहक बळी जात असताना, वाहतूक पोलिसांची ही थंड, हफ्ताखोर आणि संशयास्पद भूमिका अत्यंत चीड आणणारी आहे. किरकोळ नियमभंगांवर कारवाईचा आव आणून पोलीस प्रशासन स्वतःचे भ्रष्ट पाप झाकत आहे का? या मुजोर रिक्षाचालकांच्या अंगात मुरलेली मस्ती आणि निष्पाप लोकांच्या मृत्यूला नेमका जबाबदार कोण?
जर यापुढे नशेत गाड्या हाकणाऱ्यांवर, मुजोरी करणाऱ्यांवर आणि नागरिकांचे जीव घेणाऱ्यांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करून धडक कारवाई झाली नाही, तर संतप्त जनतेचा हा उद्रेक पोलिसांच्या अंगाशी येईल, यात तिळमात्र शंका नाही!
चौकट 1
चौकात खाकीचे ‘बुजगावणे’; हफ्त्याच्या खेळाने रिक्षावाले मोकाट!
प्रत्यक्षात वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. चौकाचौकात अंगावर पोलिसांचा गणवेश घालून वाहतूक शाखेचे कर्मचारी केवळ ‘बुजगावण्यासारखे’ उभे असलेले दिसतात. कारवाईच्या नावाखाली फक्त किरकोळ आणि सामान्य प्रवाशांना वेठीस धरायचे, आणि मूळ मुजोर, उद्धट तसेच मद्यधुंद रिक्षाचालकांकडून खिसे गरम करून त्यांना थेट सोडून द्यायचे, हाच एकमेव खाकी धंदा सध्या तेजीत सुरू आहे. जेव्हा रक्षकच भक्षक बनतात आणि हफ्त्यांच्या बदल्यात गुन्हेगारांना अभय देतात, तेव्हा सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार?
चौकट 2
चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचाच लाजीरवाणा कारभार!
आज शहरात दारूच्या नशेत धिंगाणा घालून ऑटो चालवण्याचे प्रमाण चिंताजनक रीतीने वाढले आहे. विनापरवाना, विनागणवेश आणि फ्रंट सीटवर प्रवाशांची कोंडी करत जीवघेण्या स्टाईलने गाड्या पळवणाऱ्यांची मुजोरी टोकाला पोहोचली आहे. पोलिसांनी कागदोपत्री काही लाखांचा दंड वसूल केल्याची नौटंकी केली असली, तरी नशेत धिंगाणा घालून निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या मुजोर चालकांवर ठोस आणि बेड्या ठोकणारी कारवाई करण्याचे धाडस खाकी कधी दाखवणार? ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचीच कार्यपद्धती आज वाहतूक शाखेकडून राबवली जात आहे. पैशांच्या जोरावर मुख्य गुन्हेगारांना पाठीशी घालायचे, हाच पोलिसांचा मुख्य हेतू बनला आहे!