फुलंब्री प्रतिनिधी( 25)
.फुलंब्री तालुक्यातील खामगाव शाखा टपाल कार्यालयातील रिक्त पदामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याची बाब पंचायत समिती फुलंब्रीच्या उपसभापती सौ. अश्विनीताई अजिनाथ सोनवणे यांनी डाक विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत भारतीय डाक विभागाने रिक्त पद भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वरिष्ठ अधीक्षक डाकघर कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, खामगाव शाखा टपाल कार्यालय हे एकल-हस्त (Single-Handed) कार्यालय असून सध्या कार्यालयाचा कारभार पर्यायी व्यवस्थेद्वारे चालविला जात आहे. संबंधित बीपीएम (शाखा पोस्टमास्तर) पदासाठी नियमानुसार निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून निवड झालेल्या उमेदवाराने आवश्यक प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.
डाक विभागाने संबंधित उमेदवारास तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले असून लवकरच ते कार्यभार स्वीकारणार आहे. त्यामुळे खामगाव परिसरातील नागरिकांना टपाल सेवांचा अधिक वेगवान व नियमित लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात उपसभापती सौ. अश्विनीताई सोनवणे यांनी नागरिकांच्या सोयीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.