हिंदू प्रकाशवार्ता प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर
शहराला लागून असलेल्या वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूमाफियांनी अक्षरशः थैमान घातले असून, तब्बल दीड कोटी रुपयांची ९३ गुंठे जमीन बळकावण्याचा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मूळ मालकाला अंधारात ठेवून, त्याच्या मालकी हक्काचा बोर्ड तोडायचा, तार कंपाऊंड उखडून टाकायचे आणि बोगस दस्तऐवजांच्या जोरावर हक्काची जमीन लाटायची, असा हा भयंकर गोरखधंदा राजकारणाशी संबंध असणाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात राजकारणाशी संबंधित व्यक्तीसह तब्बल ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्वसामान्यांच्या जमिनींवर डल्ला मारणाऱ्या या टोळीची मस्ती आता चांगलीच टोकाला पोहोचली आहे.तक्रारदार राजकुमार अल्गर स्वामी यांचे कुटुंब गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्यास आहे. त्यांनी सन २००७ मध्ये गुरुधानोरा शिवारातील गट नं. ८४ मधील ५ एकर २५ गुंठे जमीन कायदेशीररित्या विकत घेतली होती. जमिनीवर सिमेंट पोलचे पक्के तार कंपाऊंड करून स्वतःच्या मालकीचा बोर्डही लावला होता. सातबाऱ्यावर कायदेशीर नाव असताना आणि बटाईने कसण्यासाठी जमीन दिलेली असताना, या मुजोर भूमाफियांनी थेट जमिनीवर डल्ला मारण्याचा कुटील डाव रचला. २६ फेब्रुवारी रोजी जेव्हा बटाईदाराने फोन करून माहिती दिली, तेव्हा मालक घटनास्थळी धावून गेले. तिथे शिरजोरी करत आलेल्या गुंडांनी “आम्हाला फिरोज पठाण यांनी काम दिले आहे, तुला काय करायचे ते कर!” अशी अरेरावीची भाषा करत थेट दमदाटी केली.पडताळणी केली असता धक्कादायक बाबी समोर आल्या. हरिचंद्र फकीरराव चक्रनारायण, शांताबाई चक्रनारायण व नंदू चक्रनारायण यांच्याशी हातमिळवणी करून शरद भाऊसाहेब पवार आणि ज्ञानेश्वर जगन्नाथ मोगल यांनी कागदावर खरेदी खतांचा घोळ घातला. पुढे ही संपूर्ण ९३ गुंठे जमीन राजकारणाशी संबंधित फिरोज खाँ नबी खाँ पठाण याच्या घशात घालण्याचा कट रचण्यात आला. मूळ मालकांचे तार कंपाऊंड तोडायचे, मालकी हक्काचा फलक फाडून फेकून द्यायचा आणि राजकीय वरदहस्ताच्या बळावर दुसऱ्याच्या घाम गाळून कमावलेली संपत्ती बळकावायची, हाच या टोळीचा एकमेव उद्योग बनला आहे. फिरोज पठाण याने अशाच प्रकारे इतरही अनेक सर्वसामान्य लोकांची फसवणूक केल्याची चर्चा परिसरात जोरात सुरू आहे.