header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

सावंगी बायपास–पळशी रस्त्यावर चिखल, खडी अन् वाहतूक कोंडी; रखडलेल्या कामामुळे नागरिकांचा संताप

सिमेंट रस्त्याचे काम संथ गतीने; शालेय विद्यार्थी, दूध व्यावसायिक, नोकरदारांची रोजची फरफट

हिंदू प्रकाशवार्ता : प्रतिनिधी सिद्धेश्वर थोर

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराला जोडणाऱ्या सावंगी बायपास ते पळशी या महत्त्वाच्या मार्गावरील सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांचा संयम संपत चालला आहे. एका बाजूला रस्त्याचे काम सुरू असताना दुसरी बाजू चिखल, खडी आणि खड्ड्यांनी व्यापली असून पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. परिणामी या मार्गावर दररोज वाहतूक कोंडी होत असून हजारो नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

या मार्गावरून पळशी, सावंगी तसेच परिसरातील गावांतील नागरिक मोठ्या संख्येने दररोज छत्रपती संभाजीनगरकडे ये-जा करतात. मात्र, रस्त्याचे काम रखडल्याने वाहतूक एकाच बाजूने सुरू आहे. त्याचवेळी सिमेंट रस्त्याच्या कामासाठी टिप्पर, ट्रक आणि इतर जड वाहनांची सततची ये-जा सुरू असल्याने वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांचा अमूल्य वेळ वाया जात आहे.

पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि खडी पसरली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शालेय विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहोचणे कठीण झाले असून पालकांना त्यांना लवकर घराबाहेर काढावे लागत आहे. दूध व्यावसायिक, रुग्णवाहिका, नोकरदार आणि व्यापाऱ्यांनाही वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या कामाचा वेग अत्यंत मंद असून नियोजनाचाही अभाव दिसून येत आहे. एका बाजूचे काम पूर्ण करून तो रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्थापन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी पुरेसे इशारा फलक, वाहतूक नियंत्रक कर्मचारी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याबद्दलही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

सावंगी बायपास–पळशी हा शहराशी जोडणारा प्रमुख मार्ग असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाला गती देऊन ते युद्धपातळीवर पूर्ण करावे, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90