पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. नारी शक्ती वंदन अधिनियम दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर न झाल्यानंतर त्यांनी लाईव्ह येत देशवासीयांशी संवाद साधला.
या संबोधनात मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर निशाणा साधत, “सुधारणांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याची सवय काँग्रेसला जुनीच आहे,” असा आरोप केला. त्यांनी सांगितले की, आज लोकसभेत बहुमत नसल्यामुळे विधेयक पारित होऊ शकले नाही, मात्र यामुळे आमचा निर्धार कमी झालेला नाही.
“देशातील महिलांचा आम्हाला ठाम पाठिंबा आहे. महिला आरक्षणाच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. तसेच संसद आणि विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यापासून कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मोदी यांच्या या वक्तव्यामुळे महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.