छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थी बालकाला आणि मुलीला आवश्यक असणाऱ्या सर्व प्रतिबंधात्मक लसी वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणेतील समन्वयाचा अभाव आणि पालकांची अनास्था यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का घसरत चालल्याचे चित्र समोर आले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय लसीकरण टास्क फोर्स समितीच्या बैठकीत आरोग्य विभागाला फैलावर घेतले. “एचपीव्ही, पोलिओ, गोवर-रुबेला आणि बीसीजी या सर्वच महत्त्वाच्या लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट जिल्ह्याने तातडीने पूर्ण केलेच पाहिजे, यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही,” असे खणखणीत आणि कडक निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्यासह महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला भांबरे आणि शिक्षण विभागाच्या अधिकारी अश्विनी लाठकर उपस्थित होत्या. बैठकीत जिल्ह्यातील लसीकरणाच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता, मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून वाचवणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरणामध्ये जिल्ह्याची कामगिरी कमालीची निराशाजनक असल्याचे समोर आले. हा आरोग्याचा गंभीर पेच सोडवण्यासाठी आता केवळ कागदी घोडे न नाचवता, आरोग्य आणि शिक्षण विभागाने थेट मैदानात उतरून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. शाळा-शाळांमध्ये विशेष पालक सभांचे आयोजन करून पालकांच्या मनातील भीती आणि संभ्रम दूर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील वैजापूर, संभाजीनगर, सोयगाव आणि सिल्लोड या चार तालुक्यांमध्ये तर बीसीजी आणि पोलिओ लसीकरणाचे प्रमाण अत्यंत निचांकी आणि चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. या दुर्गम आणि दुर्लक्षित भागात तातडीने विशेष मोहीम राबवून लसीकरणाचा वेग वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर, ‘पोलिओ मुक्त भारत’ अभियानांतर्गत येत्या २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्हाभरात व्यापक पल्स पोलिओ मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत रेल्वे स्थानके, बस स्थानके, ग्रामीण भाग तसेच स्थलांतरित ऊसतोड कामगार आणि मजुरांच्या वस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. एकही बालक लस घेण्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी बूथ स्तरावर तसेच घरोघरी जाऊन मोहीम फत्ते करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका, आरोग्य दूत, सामाजिक संस्था आणि एनएसएस (NSS) च्या स्वयंसेवकांची फौज यासाठी मैदानात उतरवली जाणार आहे.
पावसाळा तोंडावर आल्याने उद्भवणाऱ्या संभाव्य आजारांचा धोका ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी आगाऊ खबरदारी घेण्याचे संकेत दिले आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागात दूषित पाण्यामुळे होणारे आजार रोखण्यासाठी ओआरएस (ORS) पावडर, झिंकच्या गोळ्या आणि इतर आवश्यक औषधांचा पुरेसा साठा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २४ तास उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता पालकांनीही आपल्या पोटच्या गोळ्यांच्या आरोग्यासाठी स्वतःहून पुढे आले पाहिजे. जवळच्या अंगणवाडी किंवा शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन बालकांना सर्व डोस वेळेत द्यावेत, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शेवटी केले आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या या ‘बडग्यानंतर’ सुस्त यंत्रणा जागी होऊन शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
चौकट
चार तालुक्यांमध्ये यंत्रणेचा फुसका बार!
जिल्ह्यातील वैजापूर, संभाजीनगर, सोयगाव आणि सिल्लोड या चार तालुक्यांमध्ये बीसीजी आणि पोलिओ लसीकरणाचे प्रमाण कमालीचे अत्यल्प आहे. पालकांमधील अज्ञान आणि आरोग्य यंत्रणेचा सुस्त कारभार यामुळे या भागात लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या तालुक्यांमध्ये आता विशेष टास्क फोर्स पाठवून, घरोघरी जाऊन युद्धपातळीवर लसीकरण पूर्ण करण्याचा कडक अल्टीमेटम जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असून निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार ठेवली आहे.
