header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

गायीला राष्ट्रीय  दर्जा द्यावा – शेख आसिफ

लवकरच मुस्लिम गौरक्षण समितीची स्थापना करणार.

ऑल इंडिया उलेमा बोर्ड वक्फ विंगच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सामाजिक सलोखा, वक्फ संपत्तीचे संरक्षण, गोसंवर्धन तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर भूमिका मांडण्यात आली. यावेळी लवकरच मुस्लिम गौरक्षण समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

यावेळी बोलताना ऑल इंडिया उलेमा बोर्ड वक्फ विंगचे महाराष्ट्र अध्यक्ष शेख आसिफ मेहबूब यांनी देशात तसेच महाराष्ट्रात जातीय सलोखा आणि बंधुभाव कायम राखणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत तसेच समाजात शांतता आणि सौहार्द टिकून राहावे यासाठी शासन, प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

गोसंवर्धनाबाबत भूमिका स्पष्ट करताना शेख आसिफ यांनी गोहत्या बंदीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी समाजाचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच गायीला राष्ट्रीय  दर्जा देण्यात यावा, अशी मागणी देशभरातून होत असून ऑल इंडिया उलेमा बोर्ड या मागणी चे समर्थन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोरक्षणाच्या नावाखाली होणारे अत्याचार आणि कायदा हातात घेण्याच्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. गौरक्षकांनी कायदा हातात न घेता संशयास्पद बाबींची माहिती पोलिसांना द्यावी व पोलिसांच्या मदतीनेच कारवाई करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली.

जिल्हाध्यक्ष सय्यद शहाबुद्दीन कादरी यांनी वक्फ संपत्तीवरील अवैध कब्जे हटविण्यासाठी वक्फ बोर्डाकडे निवेदन सादर केल्याची माहिती दिली. तसेच वक्फसंबंधित प्रलंबित तक्रारी व रखडलेली कामे तातडीने निकाली काढावीत, अशी मागणीही बोर्डामार्फत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शहराध्यक्ष अशरफ पठाण यांनी शासनाच्या महसूल विभागाच्या १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना नियमित करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. गुंठेवारी अंतर्गत बांधकामे नियमित झाल्यास पडेगाव, मिटमिटा, नारेगाव, सईदा कॉलनी, हर्सूल परिसरातील वस्त्यांमध्ये ड्रेनेज लाईन, रस्ते, पिण्याचे पाणी आदी मूलभूत सुविधा लवकर उपलब्ध होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत सामाजिक ऐक्य, धार्मिक सौहार्द, वक्फ मालमत्तांचे संरक्षण, गोसंवर्धन तसेच नागरिकांच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ऑल इंडिया उलेमा बोर्ड वक्फ विंग समाजहिताच्या प्रश्नांवर पुढेही सक्रियपणे कार्य करत राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच गोसंवर्धन आणि सामाजिक सलोखा मजबूत करण्यासाठी लवकरच मुस्लिम गौरक्षण समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती शेख आसिफ यांनी दिली.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90