रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई परिसरात मातीच्या ढिगाऱ्यात मानवी कवटी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दादरपाडा बसस्थानकासमोरील बिअर शॉपजवळ टाकण्यात आलेल्या मातीच्या भरावात ही कवटी सापडल्याने बेकायदेशीर उत्खननाच्या माध्यमातून एखादे गंभीर गुन्हेगारी प्रकरण किंवा हत्या लपविण्याचा प्रयत्न तर झाला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जासई परिसरात सुरू असलेल्या अवैध माती उत्खननामुळे डोंगर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या आहेत. मात्र आता मानवी अवशेष आढळल्याने या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. स्थानिकांच्या मते, निसर्गाची हानी करणाऱ्या या व्यवसायात आता माणुसकीचाही बळी जात असल्याचे चित्र समोर येत आहे.
भरवस्तीत आणि रस्त्याच्या कडेला मानवी कवटी सापडूनही महसूल व पोलिस प्रशासनाकडून तत्काळ कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, जासई आणि आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या मातीचे उत्खनन करून तिची वाहतूक केली जात असल्याचा आरोप आहे. या अवैध व्यवसायाकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, सापडलेली कवटी नेमकी कुठून आली, ती मातीच्या भरावात कशी पोहोचली आणि तिचा कोणत्या व्यक्तीशी संबंध आहे, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. भविष्यात आणखी मानवी अवशेष सापडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस आणि महसूल विभागाने तातडीने तपास सुरू करून कवटीची ओळख पटवावी, तसेच संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र तपास यंत्रणेकडे सोपविण्याचीही मागणी केली आहे.
