खुलताबाद तालुक्यातील पिंपरी येथे गुरुवारी (दि. ४ जुलै)रोजी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपरी ता.खुलताबाद.येथील शेततळ्यात १३ वर्षीय शालेय विद्यार्थी साई बाबुलाल घुनावत याचा मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली असून मृत्यूमागील कारणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
कुटुंबीयांनी या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केल्याने तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
साई हा पिंपरी येथे शिक्षण घेत असताना गुरुवारी दुपारी नाथ माध्यमिक विद्यालय शाळेजवळील शेतकरी सुखलाल महेर यांच्या गट क्रमांक ८० मधील शेततळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला. दुपारी सुमारे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान हा म्रृतुदेह जाधव व चव्हाण या दोन मुलांच्या निदर्शनास आल्याची बाब समोर आली त्यानंतर त्यांनी आरडाओरड करत ग्रामस्थांना माहिती दिली.
त्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत साईला शेततळ्यातून बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. साईला उपचारासाठी वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
साई हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या अकाली निधनाने घुनावत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील एकमेव आधार हरपल्याने कुटुंबीयांचा आक्रोश पाहून गावकऱ्यांचेही डोळे पाणावले. संपूर्ण पिंपरी गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ज्या शेततळ्यात साईचा मृतदेह आढळून आला ते ठिकाण त्याच्या घरापासून बऱ्याच अंतरावर असल्यघरापासून बऱ्याच अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तो इतक्या दूर कसा गेला, कोणासोबत होता का, तसेच या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. साईच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी हा केवळ अपघाती मृत्यू नसून घातपात असू शकतो? असा संशय व्यक्त करण्यात येत असून संपूर्ण घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आमच्या मुलाचा मृत्यू नेमका कसा झाला, याचे सत्य समोर यावे अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.
शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील निष्कर्षांनंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार असले तरी या दुर्दैवी घटनेने पिंपरीसह संपूर्ण परिसराला मोठा धक्का बसला असल्याचे चित्र आहे.
