header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण ६ लाख ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ जेरबंद!

​ अंबड तालुक्याचा गाडा हाकणारे तहसीलदार विजय चव्हाण अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात पुरते अडकले आहेत. स्वतः अत्यंत कर्तव्यदक्ष असल्याचा आव आणत गोरगरिबांना मदतीचे आवाहन करणाऱ्या या साहेबांचा खरा चेहरा काल (शनिवारी) सायंकाळी उघडा पडला. बीड ‘एसीबी’च्या पथकाने सापळा रचून तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण यांना रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे महसूल विभागाचे पार धिंडवडे निघाले असून संपूर्ण जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

वाळू माफिया वैतागले आणि तहसीलदारांचा ‘कार्यक्रम’ झाला!

​अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर मोठ्या कारवाया करत असल्याचा डंका पिटत होते. पण हा सगळा ‘दिखावा’ होता, आतून मात्र वसुलीची जोरदार ‘टक्केवारी’ सुरू होती, हे आता उघड झाले आहे.​अवाढव्य मागणी: अवैध वाळू उपसा करणारी पोकलंड मशीन जप्त न करण्यासाठी आणि सहा हायवा गाड्या बिनदिक्कत सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार चव्हाणांनी थेट ७ लाख रुपयांच्या मासिक हप्त्याची (मंथली) मागणी केली होती. ​त्रस्त तक्रारदाराची थेट ‘एसीबी’कडे धाव: एकीकडे महसूल प्रशासनाचा धाक दाखवून वाहनांवर कारवाई करायची आणि दुसरीकडे लाखोंचा हप्ताही वसूल करायचा, अशा दुहेरी कात्रीत अडकलेल्या तक्रारदाराने अखेर या त्रासाला कंटाळून थेट बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेतली.

‘एसीबी’चा सुसाट सापळा आणि ‘साहेबांचा’ गेम!

​तक्रारदाराच्या अर्जावरून बीड एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गोपनीय रितीने पडताळणी केली असता, तहसीलदार चव्हाण हे लाचेची मागणी करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर साहेबांशी तडजोड झाली आणि हा आकडा ६ लाख ४० हजार रुपयांवर फायनल झाला. ​शनिवारी सायंकाळी ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी चव्हाणांनी हात पुढे केला आणि दबा धरून बसलेल्या बीड एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात दस्तऐवज आणि पुराव्यासह बेड्या ठोकल्या. स्वतःला प्रामाणिक समजणाऱ्या तहसीलदारांचा ‘कार्यक्रम’ त्यांच्याच हप्तेखोरीमुळे झाला, अशी चर्चा आता रंगली आहे.

मात्सोदरी देवीच्या जागेवरही डोळा!

​तहसीलदार विजय चव्हाण यांच्या पापाचा घडा केवळ वाळूच्या हप्त्यापुरताच मर्यादित नाही, तर त्यांचे कारनामे अवाढव्य होते. प्रसिद्ध मात्सोदरी देवी संस्थानच्या जागेवर उभारण्यात येणारा ‘solar panel’चा प्रकल्प आपल्याच आप्तेष्टांच्या घशात घालण्याचा विडा या महाभागाने उचलला होता. मात्र, तिथल्या जागरूक नागरिकांमुळे त्यांचा तो डाव फसला होता. एका बाजूला देवीच्या जमिनीवर डोळा ठेवायचा आणि दुसऱ्या बाजूला जनतेला सदाचाराचे डोस पाजायचे, असा चव्हाणांचा दुटप्पी धंदा सुरू होता.

​ही धडक कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने अत्यंत गुप्तता पाळत केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रामाणिकपणाचा खोटा आव आणणाऱ्या तहसीलदार विजय चव्हाण यांची रवानगी आता थेट कोठडीत झाली असून, त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. आता या लाचखोर महाशयांचे आणखी किती काळे कारनामे बाहेर येतात, याकडे संपूर्ण जालना जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90