शेख हक्कानी
फर्दापूर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक भेट देत असतात. मात्र लेणीच्या पायथ्याशी असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) शॉपिंग प्लाझामध्ये पर्यटकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असताना पर्यटकांना थंड व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र शॉपिंग प्लाझा परिसरातील मोठ्या पाण्याच्या टाकीत पिवळसर रंगाचे व संशयास्पद स्वरूपाचे पाणी भरलेले असल्याचे निदर्शनास आले. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याची भावना पर्यटकांमध्ये व्यक्त होत आहे.
याशिवाय परिसरातील बागेजवळ बसविण्यात आलेल्या थंड पाण्याच्या फिल्टरमधूनही थंड पाण्याऐवजी गरम पाणी येत असल्याचे आढळून आले. कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या पर्यटकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अजिंठा लेणीसारख्या जागतिक वारसा स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांना मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असल्याने पर्यटन व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ, शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठ्याची गुणवत्ता तपासावी तसेच शॉपिंग प्लाझा परिसरात स्वच्छ आणि थंड पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी पर्यटक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अजिंठा लेणीसारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळाल्यास महाराष्ट्राच्या पर्यटन प्रतिमेला अधिक बळकटी मिळणार असून संबंधित विभागाने याबाबत तत्काळ कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.