header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

रस्त्याअभावी शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; प्रशासनासह लोकप्रतिनिधीचेही दुर्लक्ष महिनाभरातील वेरूळ येथील दुसरी घटना

दैनिक हिंदू प्रकाश वार्ता

छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी खुलताबाद तालुक्यातील वेरूळ गाव पर्यटन क्षेत्र म्हणून जगाच्या नकाशावर नावाजलेले असून गावाच्या आजूबाजूची परिस्थिती विकासात्मक बाब म्हणून अत्यंत बिकट आहे  यात स्थानिक लोकप्रतिनिधीचे अक्षयमय दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

वेरूळ  शिवारातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या काळे वस्तीवरील शेतकरी सखाराम किसन जाधव यांचा वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने रविवारी (दि. १९ जुलै २०२६) दुपारच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सखाराम जाधव हे आपल्या कुटुंबासह काळे वस्ती परिसरातील शेतात वास्तव्यास होते. अनेक वर्षांपासून या भागात सर्व हंगामात वाहतुकीयोग्य रस्ता नसल्याने येथील शेतकरी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रविवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. मात्र रस्ता नसल्याने ॲम्बुलन्स घटनास्थळी पोहोचू शकली नाही. अखेर त्यांना बैलगाडीतून सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत आणण्यात आले. मात्र या विलंबातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ही पहिली घटना नाही. सुमारे महिनाभरापूर्वीही अशाच परिस्थितीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून तातडीने कायमस्वरूपी रस्ता करण्याची मागणी होत आहे.

रस्ता नसल्याने नागरिकांचे हाल

– शेतकऱ्यांना पिकवलेला शेतमाल वेळेवर बाजारपेठेत नेता येत नाही.

– गर्भवती महिला, वृद्ध नागरिक व गंभीर रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नाहीत.

– रुग्णवाहिका वस्तीपर्यंत पोहोचू शकत नाही.

– शाळकरी विद्यार्थ्यांना चिखल व कच्च्या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागते.

– शेतकरी, शेतमजूर व महिलांना दैनंदिन कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

– पावसाळ्यात संपूर्ण वस्तीचा संपर्क तुटण्याची वेळ येते.

 काळे वस्तीवरील नागरिकांनी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने सर्व हंगामात वाहतुकीयोग्य रस्ता मंजूर करून काम सुरू करण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

(“माझ्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. आम्ही तातडीने ॲम्बुलन्सला फोन केला, पण रस्ता नसल्यामुळे ॲम्बुलन्स आमच्या शेतापर्यंत पोहोचू शकली नाही. नाईलाजाने बैलगाडीतून त्यांना बाहेर आणावे लागले. जर रस्ता असता तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता. आम्हाला कोणतीही मदत नको, पण या भागातील शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी रस्ता करून द्या. आमच्या कुटुंबासारखी वेळ दुसऱ्या कोणावरही येऊ नये.”

बाळू सखाराम जाधव (मृत शेतकरी सखाराम जाधव यांचे पुत्र))

(“आम्ही अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी करत आहोत. पावसाळ्यात शेतात जाणेही कठीण होते. शेतमाल बाजारात नेता येत नाही. गर्भवती महिला, वृद्ध, लहान मुले आणि आजारी रुग्णांचे प्रचंड हाल होतात. विद्यार्थ्यांना रोज जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागते. दोन शेतकऱ्यांचे जीव गेल्यानंतरही प्रशासन जागे होत नसेल, तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते?”

वाल्मीक काळे (शेतकरी, काळे वस्ती))

(“हा केवळ एका शेतकऱ्याचा मृत्यू नाही, तर ग्रामीण भागाकडे झालेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाचा परिणाम आहे. रस्त्याअभावी दोन शेतकऱ्यांचे जीव गेले, तरी प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. आज शेतकरी शेतमाल विकू शकत नाही, विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही, गर्भवती महिला आणि वृद्धांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. नागरिकांना अजून किती जीव गमवावे लागणार? प्रशासनाने तातडीने रस्ता मंजूर करून काम सुरू करावे; अन्यथा शेतकरी, ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांसह तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल.”

-सामाजिक कार्यकर्ते सतीश लोखंडे)

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90