हिंदू प्रकाशवार्ता प्रतिनिधी
जालना/भोकरदन
स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच बोरगाव जहागीर आणि ताडकळस या गावांमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) ‘लाल परी’ दाखल झाली आहे. अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण झाली असून, रामरहीम विद्यालय, सिपोरा बा. यांच्या विशेष पुढाकारातून ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता या बस सेवेचा भव्य शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. गावात प्रथमच एसटी बसचे आगमन होताच विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांनी जल्लोषात तिचे स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि टाळ्यांच्या कडकडाटात ‘लाल परी’चे स्वागत करण्यात आले. हा क्षण दोन्ही गावांसाठी ऐतिहासिक ठरला.
नवीन बस सेवा दररोज ताडकळस ➝ बोरगाव जहागीर ➝ मोळवाडी ➝ सिपोरा बा. ➝ रामरहीम विद्यालय या मार्गावर धावणार आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, ग्रामस्थांनाही तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हक्काचे सार्वजनिक वाहन मिळाले आहे.
या बस सेवा सुरू करण्यासाठी जाफराबाद आगारप्रमुख मा. पंडित साहेब, वाहतूक नियंत्रक जाधव साहेब, तसेच एम. डी. कड, सर्जेरावजी कड आणि चंद्रकांत रांधवण यांनी विशेष सहकार्य केले. शुभारंभ प्रसंगी दोन्ही गावांचे सरपंच, प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच रामरहीम विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायकजी कड, ज्ञानेश्वर महाजन, जनार्धन कुदर, शिवाजी गिरणारे, सुनील लहाने, प्रतिभा उगले, विकास भोकन, प्रद्युम्न काकड, विजय मस्के, सुनील जाधव, गोविंदजी सोनवणे, विकास सोळंकी यांच्यासह शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.