हिरवाईच्या कुशीत राष्ट्रीय पक्षी मोराचा राजेशाही थाट; पिसारा फुलवत निसर्गाच्या सान्निध्यात रंगला अविस्मरणीय क्षण
फर्दापूर प्रतिनिधी शेख हक्कानी
फर्दापूर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी म्हटले की डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या प्राचीन लेण्या डोंगरदऱ्या आणि इतिहासाच्या पाऊलखुणा मात्र याच अजिंठ्याच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये सध्या निसर्गाने आणखी एक सुंदर चित्र रंगवले आहे हिरवाईने नटलेल्या डोंगराच्या कुशीत राष्ट्रीय पक्षी मोराने आपला भव्य पिसारा फुलवत दिलेले दर्शन कॅमेऱ्यात कैद झाले असून हा नयनरम्य क्षण निसर्गप्रेमींच्या मनाचा ठाव घेत आहे
पावसाळ्यामुळे अजिंठ्याच्या डोंगररांगांनी हिरवा शालू पांघरला आहे धुक्याची हलकी चादर डोंगरातील शांतता सभोवतालची हिरवाई आणि त्यात डौलाने पिसारा फुलवून उभा असलेला मोर जणू निसर्गाच्या रंगमंचावर स्वत निसर्गराजानेच एक सुंदर कलाकृती साकारली आहे
मोराच्या पिसाऱ्यातील प्रत्येक रंग जणू अजिंठ्याच्या हिरवाईशी संवाद साधताना दिसत होता क्षणभर असे वाटावे की या मोराला ना जगाची चिंता ना कसली घाई फक्त डोंगराच्या कुशीत वाऱ्याच्या साथीने आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनमोकळेपणाने जगण्याचा आनंद
अजिंठ्याच्या डोंगरातील हा सुंदर क्षण केवळ एका पक्ष्याचे दर्शन नसून निसर्ग आणि वन्यजीव यांच्यातील अतूट नाते सांगणारा जिवंत अनुभव ठरत आहे अजिंठ्याची ओळख जगभरातील ऐतिहासिक लेण्यांमुळे असली तरी या परिसरातील समृद्ध जैवविविधता आणि निसर्गसौंदर्यही तितकेच मन मोहून टाकणारे आहे याचीच प्रचिती या दृश्यातून येते
लेण्यांच्या इतिहासाला निसर्गाच्या सौंदर्याची साथ लाभलेल्या अजिंठ्यात मोराचा हा पिसारा म्हणजे जणू निसर्गाने स्वतःच केलेली रंगांची उधळण