हिंदू प्रकाशवार्ता प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर
हर्सूल नायगाव येथे वीज दुरुस्तीचे काम करत असताना महावितरणचा झिरो वायरमन विजेचा तीव्र धक्का बसून गंभीररीत्या भाजल्याची दुर्देवी घटना घडली आहे. घडलेल्या या अपघातात जखमी झालेल्या वायरमनवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
इलियास शेख (वय अंदाजे ४५, रा. नायगाव) असे गंभीर जखमी झालेल्या झिरो वायरमनचे नाव असल्याचे गावातील सूत्रांनी सांगितले आहे. या घटनेबाबत माहिती देताना सावंगीचे महावितरणचे अभियंता प्रदीप गव्हांदे यांनी सांगितले की, दुरुस्तीचे काम सुरू असताना सुरुवातीला वीजप्रवाह बंद होता, मात्र अचानक वीजप्रवाह पूर्ववत झाल्यामुळे (परतल्यामुळे) हा भीषण अपघात घडला.
या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे इलियास शेख यांच्या गरीब कुटुंबावर मोठे आर्थिक व मानसिक संकट कोसळले आहे. महावितरण प्रशासनाकडून पीडित कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत मिळायला हवी, अशी तीव्र मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच, दुरुस्तीच्या कामासाठी पोलवर चढण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्याला किंवा झिरो वायरमनला आवश्यक ती सर्व सुरक्षा साधने पुरवली होती का? असा गंभीर प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. अलीकडच्या काळात महावितरणचे नियमित वायरमन अनेकदा अशा अप्रशिक्षित आणि हंगामी ‘झिरो वायरमन’ना जीवरक्षक आणि जोखमीच्या कामांसाठी पुढे ढकलतात, आणि याच निष्काळजीपणामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचा गंभीर आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन निष्काळजीपणा दाखवणारे व कामचुकार वायरमन तसेच संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नायगाव परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.