कन्नड तालुका प्रतिनिधी :
कन्नड तालुक्यातील अंधानेर–मुंडवाडी हा महत्त्वाचा संपर्क रस्ता सध्या अत्यंत दुरवस्थेत असून वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवास धोकादायक बनला आहे.
पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या मार्गावरून दररोज शेकडो नागरिकांची ये-जा होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्त्याचे कायमस्वरूपी मजबुतीकरण करावे, अशी मागणी केली आहे. लवकरात लवकर काम सुरू न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
प्रतिक्रिया
– अंधानेर–मुंडवाडी रस्त्याची झालेली दुरवस्था ही अत्यंत गंभीर बाब आहे. या रस्त्यावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिक प्रवास करतात. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येची तातडीने दखल घेऊन रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रश्न अधिक काळ प्रलंबित ठेवू नये, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
*श्री.संदीप आर आळीगं*
(सामाजिक कार्यकर्ते मुंडवाडी)