छत्रपती संभाजीनगर
राज्य शासनाच्या. ‘सेफ फूड सेफमहाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत शहरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे एमआयडीसी चिकलठाणा भागातील एका डेअरी युनिटवर छापा टाकून तब्बल ३ लाख १२ हजार ३८० रुपये किमतीचा ९५० किलो वजनाचा भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ व खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एमआयडीसी चिकलठाणा येथील सर्व्हिस इंडस्ट्री प्लॉट नंबर सी-४५ मधील ‘मेसर्स अमोल दूध डेअरी’ (मालक: दामोदर केदार) येथे मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थांत भेसळ केली जात होती. छापा टाकला असता, त्या ठिकाणी १० ते १२ नॉन-फूड ग्रेड सोयाबीन ऑइलचे बॅरल आढळून आले. या घातक सोयाबीन तेलाचा उपयोग ‘ॲनॅलॉग पनीर’ आणि शुद्ध गाईचे तूप तयार करण्यासाठी केला जात असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी प्रशासनाने तत्काळ पावले उचलत संबंधित उत्पादन युनिटचा परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करून आस्थापना पूर्णपणे बंद केली आहे.
या कारवाईमध्ये एकूण ९५० किलो वजनाचा ३,१२,३८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २९९ किलो सुट्टे तूप (किंमत ₹१,६७,४४०), १९९ किलो सुट्टी साय किंवा क्रिम (किंमत ₹५५,७२०), १७४ किलो पनीर (किंमत ₹४५,२४०) आणि २७८ किलो सुट्टे रिफाइंड सोयाबीन तेल (किंमत ₹४४,४८०) यांचा समावेश आहे.
तपासादरम्यान, ‘अमोल दूध डेअरी’ ही शहरातील ‘लक्ष्मी डेअरी’च्या तीन वेगवेगळ्या रिटेल काऊंटरवर पनीर व गाईच्या तुपाचा पुरवठा करत असल्याचे उघड झाले. त्यानुसार प्रशासनाने लक्ष्मी डेअरीच्या टीव्ही सेंटर एरिया, कामगार चौक एरिया आणि दर्गा रोडवरील श्रीराम चौक एरिया येथील तीनही शाखांवर धडक कारवाई केली. या दुकानांमधून गाईच्या तुपाचे अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, तेथील ४१ किलो वजनाचा (किंमत ₹२९,३००) गाईच्या तुपाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
ही धडक मोहीम सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्धिकी आणि योगेश चिभादे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.