जवाहरनगर पोलिसांचा मोठा पर्दाफाश; ४४.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, तीन आरोपी जेरबंद
हिंदू प्रकाशवार्ता : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मालकाच्या गोडाऊनमध्ये काम करत असतानाच तब्बल दोन वर्षांपासून एक-दोन टीव्ही करत चोरी करून ते परस्पर विकणाऱ्या नोकरांच्या टोळीचा जवाहरनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून आणि त्यांनी विक्री केलेल्या विविध ठिकाणांहून १२२ एलईडी टीव्ही, टीव्हीचे सुटे भाग आणि चोरीसाठी वापरलेले वाहन असा तब्बल ४४ लाख ४४ हजार ९७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
व्यापारी रविंद्रसिंह जसवंतसिंह जोहर यांच्या सिंधी कॉलनीतील गोडाऊन तसेच मोंढा नाका येथील निशा प्राईड इमारतीतून सन २०२४ पासून २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या आकाराचे सुमारे १५० एलईडी टीव्ही आणि टीव्हीचे सुटे भाग चोरीला गेले होते. या मुद्देमालाची किंमत सुमारे ३४ लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. याप्रकरणी २५ ऑगस्ट रोजी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर व सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा सय्यद मजहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मनिष दिलीप नरवडे (२६), अकबर शेख मोहम्मदअल्ली शेख (५५) आणि राजेंद्रकुमार फुलचंद परदेशी (५३) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गोडाऊनमधून २०२४ पासून टप्प्याटप्प्याने एलईडी टीव्ही चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचे टीव्ही छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण भागासह जालना आणि नाशिक येथे ओळखीच्या व्यक्तींमार्फत कमी किमतीत विकल्याचेही त्यांनी सांगितले.
आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून १२२ एलईडी टीव्ही व सुटे भाग जप्त केले. यासोबतच गुन्ह्यात वापरलेले वाहनही हस्तगत करण्यात आले. या कारवाईमुळे गोडाऊनमधील चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे.
ही कारवाई मपोउपनि. राधा लाटे, पोउपनि. रविकुमार गादेकर, सफौ चंद्रकांत पोटे, पोह रावते तसेच पोलीस अंमलदार विजेश चव्हाण, राजेंद्र शिंदे, मारुती गोरे, कपिल खिल्लारे व सुरे यांच्या पथकाने केली.