ज्येष्ठांचा दांडगा उत्साह
छत्रपती संभाजीनगर:
वय हे फक्त एक मानसिक बंधन असतं, जर मनात इच्छा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.” हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, पण वयाच्या ७० व्या वर्षी मी याचा प्रत्यक्ष अनुभव घेत शहरातील ज्येष्ठांनी तरुणांसोबत सायकल चालवत जागतिक सायकलिंग दिवस उत्साहात साजरा केला. व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर पण वय ७९ वर्षे असलेले जयंत सांगवीकर आपले सहकारी
सचिन गोडसे, उमेश भाले, जयंत आणि धनंजय भाले यांच्यासह रोजच्याप्रमाणे सकाळी क्रांतीचौकरोड,विद्यापीठ आदी मार्गाने सायकल फेरी काढत उत्साहात रवाना झाले. तर सकाळी 5:30 वाजता अतुल जोशी,मनीष खंडेलवाल यांनी करमाड गाठत परतीच्या प्रवासासह 50 किलोमीटर अंतर वेगाने पूर्ण केले.
सायकलवरून निसर्गाच्या सानिध्यात फिरत व मानसिक ताणतणाव दूर करण्याचा अनुभव घेतला.
सांगवीकर हे मागील तीन वर्षांपासून ‘पंढरपूरची सायकल वारी’करत आषाढी एकादशी निमित्त सायकलवरून विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. या वर्षीही जुलै महिन्यात पंढरीच्या विठूरायाला भेटण्यासाठी सायकलवरून जाण्याची माझी पूर्ण तयारी झाली आहे. दोन दिवसांत साधारण ३४० किलोमीटरचे अंतर पार करताना शरीराला थकवा जाणवत नाही. याचे कारण म्हणजे मनात असलेली विठ्ठलाची भक्ती आणि सायकलिंगमुळे शरीराला मिळालेली प्रचंड अंतर्गत ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्नी आजारी आहे, तरी पंढरपूर वारीचे 1000 किमी चे चॅलेंज या महिना अखेर पूर्ण करणार आहे, असेही ते म्हणाले.यासह नारायण चकोर यांनी आजच्या दिवशी 50 किमी नाॅन स्टाॅप अंतर पूर्ण केले. कल्याण खोसे यांनी 21 किमी, आर.पाटील 53 किमी अंतर पूर्ण केले.
प्रकाश गिरी यांची 150 किमी फेरी
ज्येष्ठ सायकलिस्ट प्रकाश गिरी यांनी तब्बल 150 किमी सायकल चालवत आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीचा प्रत्यय दिला.शिवाजी राजे यांनी 35 किमी त अनिल टाकळीकर यानीही हा दिवस सायकलवरून फेरी मारत साजरा केला
सर्व सायकलपटू पंढरपूरवारीची तयारी करत असून रविवारी डाॅ.अमित समर्थ यांच्या आवाहनानुसार 50 किमी आभासी चॅलेंज तसेच पोलीस आयुक्तालय येथून स्पोर्ट्स अॅथाॅरिटी ऑफ इंडिया आयोजित “संडे ऑन सायकल ” उपक्रमात सहभागी होणार आहेत,अशी माहिती छत्रपती संभाजीनगर सायकल संघटनेचे सचिव चरणजितसिंग संघा यांनी दिली.तसेच सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष डाॅ.विजय व्यहारे,देवगिरी सायकलिंग क्लबचे अध्यक्ष पांडुरंग लहाने, तेजस्विनी सायकलिंग क्लबच्या माध्यमातून नागरिकांनी वैयक्तिक सायकलिंग केल्याचेही सांगितले.
