नवीन नांदेड (प्रतिनिधी) : काळेश्वर मंदिरात सायंकाळची आरती करून घरी परतणाऱ्या एका युवकावर चार जणांनी धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर जीवघेण्या हल्ल्याचे प्रकरण आता खुनात रूपांतरित झाले आहे.
माहितीनुसार, अर्जुन तातेराव हंबर्डे (वय 31) हे काल रात्री सुमारे 8.30 वाजता नेहमीप्रमाणे काळेश्वर मंदिरात सायंकाळच्या आरतीसाठी गेले होते. आरतीनंतर ते घरी परतत असताना मंदिराजवळील चौकात चार जणांनी त्यांना अडवून अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्रांनी करण्यात आलेल्या या हल्ल्यात अर्जुन हंबर्डे गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी प्रवीण हंबर्डे, शेख आरिफ, चैतन्य पांचाळ आणि सुरज तगडे या चार संशयितांना ताब्यात घेतले असून, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, एफआयआरमधील अधिक तपशील समोर येणे बाकी आहे.
मृत अर्जुन हंबर्डे यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
