गुरुवार, 4 रोजी लग्नाचे वर्हाड घेऊन जाणार्या टेम्पोचा वैजापूर- गंगापूर रस्त्यावर तालुक्यातील घायगाव शिवारात अपघात झाला होता. या अपघातात 2 ठार झाले असून, दोन जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 20 वऱ्हाडीपैकी 16 जणावर छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सर्व अपघातग्रस्तांची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भेट घेत विचारपूस केली.
यावेळी रुग्ण आणि नातेवाईक यांना आधार देत सर्वांना चांगला उपचार मिळून बरे होतील, अशी प्रार्थना खैरे यांनी केली. डॉक्टर आणि सर्व स्टाफ परिश्रम घेत असून, नातेवाईकांनी विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, उपअधिष्ठाता डॉ. सुरेश हरबडे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, अभ्यागत समिती सदस्य नारायण कानकाटे, उपशहरप्रमुख विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा अधिकारी सुरेश भाले आदी उपस्थित होते. पाटेगाव ता. पैठण येथील काशिनाथ रामचंद्र ठाकरे यांच्या मुलाचे लग्न येवला तालुक्यातील गोपाळवाडी येथील शिवाजी वाघ यांच्या मुलीशी शुक्रवारी असल्याने वऱ्हाडी जातं असताना अपघात झाला होता.
