header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

गुटखा माफियांचा थरकाप! छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA पथकावर जीवघेणा हल्ला; महिला अधिकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/ChatGPT-Image-Jun-10-2026-09_29_48-AM-1.png

जिल्ह्यात गुटखा आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांची तस्करी करणाऱ्या माफियांनी आता थेट शासकीय अधिकाऱ्यांवरच हात टाकण्यास सुरुवात केली आहे. गंगापूर तालुक्यातील रहिमपूर येथे प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासन (FDA) च्या पथकावर गुटखा तस्करांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली. तस्करांनी थेट महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्याच्या अंगावर काळी स्कॉर्पिओ गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि ‘गोळ्या घाला’ अशी धमकी देत अधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेला गुटख्याचा टेम्पो जबरदस्तीने पळवून नेला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती प्रज्ञा प्रमोद सुरसे यांनी वाळूज पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली असून, पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना मुसक्या आवळल्या आहेत.​अन्न सुरक्षा अधिकारी घटनास्थळी टेम्पो ताब्यात घेऊन थांबलेले असताना, काही संशयास्पद वाहने त्यांच्या अवतीभवती चकरा मारत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामध्ये रॉयल एनफिल्ड बुलेट (MH.20.GH.8240) वरून दोन इसम सातत्याने घिरट्या घालत अधिकाऱ्यांची माहिती कोणालातरी फोनवर देत होते. याशिवाय दुसरी दुचाकी (MH.20.BZ.6094), एक पांढऱ्या रंगाची क्रेटा कार (MH.20.GV.9408) आणि एक किया कार (MH.57.0816) देखील तिथे रेकी करत होत्या. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून प्रज्ञा सुरसे यांनी तात्काळ वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  शिवचरण पांढरे यांना फोन करून तातडीने पोलीस बंदोबस्त पाठवण्याची विनंती केली.

​या घटनेनंतर घाबरलेल्या शासकीय पथकाने वाळूज पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. अधिकाऱ्यांनी काढलेले फोटो, व्हिडिओ आणि गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवून रेकी करणाऱ्या बुलेटसह दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुनील जयराम ढोले आणि सागर रामकिसन झळके अशी आहेत. तर प्रभाकर सोळुंके, नजीर शेख, दत्ता सुभाष पाटेकर, सद्दाम शेख,  गायकवाड आणि त्यांचे इतर साथीदार सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

​वाळूज पोलिसांनी या प्रकरणी CR No. 239/26 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०९(१) (जीवे मारण्याचा प्रयत्न करणे), कलम १३२ (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून रोखण्यासाठी हल्ला करणे), आणि कलम १८९(२), १९०, १९१(२) नुसार बेकायदेशीर जमाव जमवून दंगल घडवणे व सरकारी कामात अडथळा आणणे या गंभीर कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, गुटखा माफियांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पुढील तपास वाळूज पोलीस करत आहेत

चौकट 

​”गोळ्या घाला रे…”; महिला अधिकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न

​पोलीस मदत पोहोचण्यापूर्वीच, तिथे अचानक एका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी वेगाने आली. त्यातून उतरलेल्या गुंडांनी आरडाओरडा करत अधिकाऱ्यांना घेरले. “गोळ्या घाला रे गोळ्या घाला,” अशा धमक्या देत ते अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून आले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आणि गुंडांच्या हातात हत्यारे असण्याच्या भीतीने पथकातील तिन्ही पुरुष अधिकारी वेगवेगळ्या दिशेने पळाले. ​या धावपळीत महिला अधिकारी श्रीमती प्रज्ञा सुरसे यांना वेगाने पळता आले नाही. हीच संधी साधून स्कॉर्पिओ चालकाने थेट सुरसे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्याचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुरसे यांनी अत्यंत चपळाईने स्वतःला बाजूला झोकून दिल्यामुळे त्यांचे प्राण थोडक्यात वाचले. या गोंधळाचा फायदा घेऊन आरोपींनी त्यांच्यासोबत आणलेल्या एका चालकाला आयशर टेम्पोत बसवले आणि गुटख्याने भरलेला टेम्पो, स्कॉर्पिओ व इतर वाहनांसह सर्व आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

.चौकट 

गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री छापा

सह आयुक्त (अन्न) यांच्या आदेशान्वये अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती प्रज्ञा सुरसे, सहायक आयुक्त विवेक पाटील, अधिकारी फरिद सिद्दीकी आणि अमोल कांबळे यांचे पथक ८ जून रोजी रात्रीच्या सुमारास वैजापूर परिसरात कारवाई करत होते. यादरम्मत पथकाला गुप्त बातमीदाराकडून अत्यंत गोपनीय माहिती मिळाली की, गंगापूर तालुक्यातील रहिमपूर येथील ‘मे. जी.के. रोलर फ्लोअर मिल’ समोर प्रतिबंधित गुटख्याने भरलेला एक आयशर टेम्पो उभा आहे. या माहितीच्या आधारे पथकाने ९ जून रोजी पहाटे ठीक ०१:१५ वाजता सदर ठिकाणी छापा टाकला. तेथे MH.16.CD.8296 क्रमांकाचा आयशर टेम्पो उभा असलेला आढळला. अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, त्यात प्रतिबंधित अन्नपदार्थांची (गुटखा व पानमसाला) तब्बल २५ ते ३० मोठी पोती आढळून आली. पथकाने तात्काळ हा टेम्पो आपल्या ताब्यात घेतला.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90